पाचोऱ्यात ऑपरेशन सिंदुरच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद व रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन

पाचोरा येथील नगरपरिषद व रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑपरेशन सिंदूर रक्तदान अभियान” अंतर्गत “महा रक्तदान” शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन यांच्या सौजन्याने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 14 मे 2025 बुधवार रोजी सकाळी आठ ते बारा वाजे दरम्यान हुतात्मा स्मारक छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचोरा येथे या महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पहलगाम येथे निरपराध पर्यटकांवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करून 26 पर्यटकांची हत्या केली होती. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेना दलाने अतिरेकी व त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तान विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम उघडली. या मोहिमेच्या निमित्ताने संपूर्ण भारतात जाज्वल्य राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन झाले. त्यानुसार शासनाच्या आदेशाप्रमाणे या मोहिमेअंतर्गत आपला भारत देश व भारतीयांसाठी रक्तदान करून देश कार्यात आपले योगदान देण्याची संधी या महा रक्तदान शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाचोरा शहर व तालुक्यातील देशभक्त नागरिकांनी , युवकांनी या महा रक्तदान शिबिराला उपस्थिती देऊन रक्तदान करावे असे आवाहन मुख्याधिकारी मंगेश देवरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील यांनी केले आहे.