काळजाचा थरकाप: झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला काळ; दोन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

पुणे: पुण्यातील आळंदी येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, झोक्यातून पडू नये म्हणून आईने काळजीपोटी बांधलेल्या रुमालाचा फास लागून दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मोक्ष संदीप काळे असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून, त्याचे वडील भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. शनिवारी सकाळी आईने मोक्षला आंघोळ घालून आणि दूध पाजून झोक्यात झोपवले होते. तो झोपेतून खाली पडू नये या उद्देशाने आईने झोक्याला मध्यभागी एक रुमाल बांधला आणि ती घरातील कामात व्यस्त झाली. मात्र, काही वेळाने मोक्ष जागा झाला आणि झोक्यातून खाली उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याच्या गळ्याला रुमालाचा फास बसला. आईने जेव्हा त्याला पाहिले तेव्हा तो लटकलेल्या अवस्थेत आढळला, ज्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेनंतर मोक्षला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच १ जानेवारी रोजी मोक्षचा दुसरा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता, मात्र नियतीच्या क्रूर खेळामुळे काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत मोक्ष हा पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील माजी सरपंच कै. पांढरीनाथ सावळे यांचा नातू आणि पत्रकार गणेश शिंदे यांच्या बहिणीचा नातू होता. आईने मुलाच्या सुरक्षिततेसाठी घेतलेली काळजीच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने आळंदी आणि जामनेर तालुक्यातील किन्ही परिसरातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. एका हसत्या-खेळत्या चिमुकल्याचा अशा प्रकारे अंत झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.





