पाचोऱ्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळ दाखल!जळगाव जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी रस्सीखेच; मात्र सचिन सोमवंशी यांच्या नावाची चर्चा

पाचोरा: जळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल होण्याचे संकेत मिळत असून, पाचोरा येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार आणि खासदारांचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ दाखल झाले आहे. या दौऱ्याचा मुख्य उद्देश जिल्ह्यासाठी दोन नवीन जिल्हाध्यक्षांची निवड करणे हा असल्याचे समजते. या निवडीसाठी पक्षाच्या वतीने चाचपणी सुरू झाली असून, पक्ष संघटनेला बळकटी देणाऱ्या सक्षम नेतृत्वाचा शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक नावांची चर्चा सुरू झाली असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
या संभाव्य निवडीमध्ये पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन दादा सोमवंशी यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मागील दीर्घ काळापासून काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि पक्षाचे नाव चर्चेत ठेवण्यासाठी सोमवंशी यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. समाजातील शोषित, वंचित आणि पीडितांचे प्रश्न सातत्याने शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच तत्पर राहिले आहेत. त्यांच्या याच जनसंपर्कामुळे आणि पक्षनिष्ठेमुळे वरिष्ठांकडून त्यांच्या नावावर मोहोर उमटवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून मात्र पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





