गोराडखेडा येथे सर्पदंशाने बैलाचा मृत्यू; गरीब शेतकऱ्याला शासकीय मदतीची प्रतीक्षा

पाचोरा – गोराडखेडा बुद्रुक: येथील गरीब शेतकरी भगवान शिवाजी पाटील यांच्या शेतातील (गट नंबर १४२) एका बैलाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिनांक २७ मे २०२६ रोजी रात्री ९ ते १० वाजेपर्यंत बैल अगदी व्यवस्थित चारापाणी खात होता. मात्र, दुसऱ्या दिवशी गुरुवार, दिनांक २८ मे २०२६ रोजी सकाळी शेतकरी भगवान पाटील हे शेतात गेले असता, त्यांना त्यांच्या जोडप्यापैकी एक बैल मयत अवस्थेत आढळून आला. बैलाच्या शरीरावरील सर्व लक्षणे तपासली असता, त्याला रात्रीच्या वेळी सर्पदंश (साप चावल्याने) झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब शेतकरी राजाला तहसील कार्यालयामार्फत लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी, अशी आर्त हाक आता दिली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ पावले उचलली. सकाळी बाजूच्या शेतात असणारे ग्रामपंचायत शिपाई योगेश ईश्वर पाटील यांनी गोराडखेडा खुर्दचे सरपंच मनोज (आप्पा) पाटील यांना फोनवरून सर्व हकीकत सांगितली. सरपंच मनोज आप्पा यांनी थेट घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली व तात्काळ गोराडखेडा तलाठी मयुरी पाटील मॅडम आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पशुसंवर्धन विभागाचे देवेंद्र परदेशी, जगदीश श्रावण पाटील, डॉ. विनय सुनील पाटील तसेच सरपंच मनोज आप्पा, ग्रामपंचायत शिपाई योगेश पाटील आणि शेतकरी विकास हिरामण पाटील यांच्या उपस्थितीत मयत बैलाचा पंचनामा करण्यात आला. पशुसंवर्धन आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आता पीडित शेतकऱ्याला तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.





