पाचोरा तालुक्यात कपाशी व्यवहारातून शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक; व्यापारी फरार, शिवसेनेचे पोलीस ठाण्यात निवेदन

पाचोरा: पाचोरा तालुक्यातील तारखेडा आणि परिसरातील अनेक शेतकरी कपाशी खरेदी व्यवहारातून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचे बळी ठरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या वीस वर्षांपासून पाचोरा येथे वास्तव्यास असलेले कपाशी व्यापारी हरिदास मोहनदास ठक्कर यांनी परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडून उधारीवर कपाशी खरेदी केली होती. यासाठी काही शेतकऱ्यांना धनादेश (चेक्स) देण्यात आले होते, तर अनेकांचे व्यवहार तोंडी विश्वासावर झाले होते. मात्र, या मालाचे कोट्यवधी रुपये अद्याप थकीत असतानाच, संबंधित व्यापारी अचानक आपल्या कुटुंबासह फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारामुळे हवालदिल झालेल्या पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पाचोरा तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये धडक देऊन प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे पोलिसांनी व्यापाऱ्याविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि आर्थिक अपहाराचे गुन्हे दाखल करून तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आरोपीचा माग काढण्यासाठी मोबाईल सीडीआर, बँक आणि यूपीआय व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज आणि टोल नाक्यांवरील नोंदींची सखोल तपासणी करण्याची मागणीही शिवसेनेने केली आहे.
या मोठ्या आर्थिक संकटानंतर शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील यांनी तालुक्यातील सर्व पीडित शेतकरी बांधवांना न घाबरता पुढे येण्याचे जाहीर आवाहन केले आहे. ज्या शेतकऱ्यांची या व्यापाऱ्यामुळे आर्थिक फसवणूक झाली आहे, त्यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात आपली स्वतंत्र तक्रार नोंदवावी आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेली पावती, बिल, धनादेश, मोबाईल संदेश किंवा इतर कोणतेही बँक व्यवहाराचे पुरावे प्रशासनाकडे सादर करावेत, असे त्यांनी म्हटले आहे. जास्तीत जास्त शेतकरी पुढे आल्यास सर्व तक्रारी आणि ठोस पुरावे एकत्रित करून या प्रकरणाचा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर विभागाकडे सामूहिक स्वरूपात पाठपुरावा करणे सोपे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “शेतकऱ्यांची एकजूट, ठोस पुरावे आणि सामूहिक लढा यांच्या बळावरच या फसवणुकीविरुद्ध न्याय मिळवता येईल,” असे सांगत राजेंद्र पाटील यांनी पीडित शेतकऱ्यांना या लढ्यात पूर्ण ताकदीने पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले आहे.





