पाचोऱ्यात एका खाजगी रुग्णालयातील प्रकार? १४ रुपयांच्या सलाईन नळीसाठी २०१ ची लूट; “माझ्याच मेडिकलमधून औषध घ्या, नाहीतर पेशंट घरी न्या!” – मुजोर डॉक्टरांचा रुग्णाच्या नातेवाईकाला दम

पाचोरा (राहुल महाजन,संपादक): “डॉक्टर हा समाजासाठी देवासारखा असतो” या उदात्त भावनेला हरताळ फाळणारा एक धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार पाचोरा शहरातील एका खाजगी दवाखान्यात उघडकीस आला आहे. उपचारासाठी आलेल्या एका असहाय्य महिलेला आणि तिच्या मुलाला थेट “माझ्याच मेडिकलवरून औषधे घे, नाहीतर तुझा पेशंट उचल आणि निघून जा!” असा उघड हुकूम देत डॉक्टरांनी बाहेरचा रस्ता दाखवला. औषधांच्या नावाखाली होणाऱ्या अवाजवी लुटीचा पर्दाफाश एका शिक्षित तरुणाने केला असता, त्याला वैद्यकीय सेवेऐवजी मुजोरपणा आणि धमक्यांचा सामना करावा लागला आहे.
घटनेची हकीकत अशी की, परिसरातील एक युवक आपल्या आईच्या उपचारासाठी पाचोऱ्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये गेले होते. डॉक्टरांनी उपचारासाठी सलाईन आणि इतर औषधांची चिठ्ठी लिहून आपल्याच मेडिकलवर पाठवले. मात्र, सलाईन लावण्यासाठी लागणारी सुई आणि नळी (IV Set) ची किंमत मेडिकल चालकाने चक्क ₹२०१ रुपये लावली!
जीएसटी आणि इतर कारणांचे तुणतुणे वाजवून ही लूट सुरू असल्याचे लक्षात येताच, सोबत असलेल्या शिक्षित तरुणाने सतर्कता दाखवली. त्याने हीच औषधे आणि नळी शहरात उपलब्ध असलेल्या ‘जेनेरिक मेडिकल’वर तपासली असता, जेनेरिक औषध दुकानात अवघ्या ₹१४ रुपयांत ती उपलब्ध होती! म्हणजेच एका साध्या नळीमागे रुग्णाची तब्बल १८७ रुपयांची उघड-उघड फसवणूक केली जात होती.
तरुणाने जेनेरिक मेडिकलवरून १४ रुपयांची औषधे आणून डॉक्टरांसमोर ठेवली, तेव्हा उपचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याऐवजी डॉक्टरांचा तिळपापड झाला. “औषधे माझ्याच मेडिकलवरून घ्यावी लागतील, अन्यथा पेशंट घरी घेऊन जा,” असा अरेरावीचा सूर आळवत या डॉक्टरांनी एका महिलेचा आणि तिच्या मुलाचा तीव्र अपमान केला. रुग्णाच्या असहायतेचा फायदा घेत स्वतःचे ‘मेडिकल कमिशन’ लाटण्यासाठी या महाशयांनी वैद्यकीय क्षेत्राच्या सर्व मर्यादा व नियम पायदळी तुडवले.
आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी वेळोवेळी रुग्णांना स्वस्त आणि जेनेरिक औषधे घेण्याचे आणि जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला साथ देत तरुण जागरूक झाला, तर त्याला डॉक्टरच्या ‘पंटरांनी’ (चेल्यांनी) धमकावण्यास सुरुवात केली. “डॉक्टर करोडपती आहेत, त्यांचे कोणी काही वाकडे करू शकत नाही. उलट तुझ्यावरच काही करतील,” अशी धमकी देऊन तरुणाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ही सर्व आपबीती आणि डॉक्टरांच्या मुजोरपणाचा पुरावा एका व्हिडिओमध्ये कैद झाला असून, पीडितांनी ही व्यथा ‘मधुर खानदेश’चे संपादक राहुल महाजन यांच्यासमोर मांडली आहे. सामाजिक भान आणि डॉक्टरांच्या व्यवसायाची उरली-सुरली पत राखण्यासाठी हा व्हिडिओ सध्या सार्वजनिक केला जात नसला, तरी संबंधित मुजोर डॉक्टर कोण, हे पाचोऱ्यातील वैद्यकीय वर्तुळाला चांगलेच ठाऊक आहे. डॉक्टरांना आता तरी सुधरा (फक्त लूट मार करणाऱ्या डॉक्टरांसाठी…. इतर डॉक्टर बांधव देवदूत आहेत यात काही शंका नाही)





