दिघी विकास कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत एकजूट: रमेश हिलाल ठाकूर यांची बिनविरोध निवड

दिघी येथे विविध विकास कार्यकारी सोसायटी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ग्रामस्थांच्या विशेष बैठकीत एक महत्त्वपूर्ण आणि आदर्शवत निर्णय घेण्यात आला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवत, कार्यसम्राट आमदार मा. किशोर आप्पा पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर व मार्गदर्शनावर पूर्ण विश्वास दर्शवून सर्व गावकऱ्यांनी रमेश हिलाल ठाकूर (गबा आणा) यांची सोसायटीच्या संचालकपदी एकमताने बिनविरोध निवड केली.
गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत हा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. कोणतीही निवडणूक न होता बिनविरोध निवडीचा निर्णय झाल्यामुळे दिघी गावातील परस्पर विश्वास, अभेद्य एकजूट आणि विकासाभिमुख विचारसरणी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
या बिनविरोध निवडीनंतर उपस्थितांनी नवनिर्वाचित रमेश हिलाल ठाकूर यांचे उत्साहात अभिनंदन करून त्यांना भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, विकास कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी व सभासदांच्या हितासाठी पारदर्शक आणि प्रभावी काम केले जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. “गावाच्या प्रगतीसाठी एकमताने घेतलेला निर्णय हीच खरी गावाची ताकद आहे,” या भावनेने संपूर्ण परिसरात या निर्णयाचे स्वागत होत आहे.





