तळई ग्रामपंचायतीत दिपा पवार यांना कायमस्वरूपी सफाई कर्मचारी म्हणून नियुक्ती

मधुर खान्देश वृत्तसेवा, तळई (ता. एरंडोल): दि.२८ मे,२०२५ | एकता सफाई कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून, तळई (ता. एरंडोल) येथील ग्रामपंचायत कार्यालयात दिपा शंकर पवार यांना सफाई कर्मचारी म्हणून कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात आले आहे. दिपा पवार यांचे पती यांच्या निधनानंतर त्या ग्रामपंचायतीत रोजंदारी सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या.
एकता सफाई कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आतिश चांगरे यांच्या पुढाकाराने आणि ग्रामपंचायत तळईचे सरपंच भाईदास संभाजी मोरे, उपसरपंच प्रभाकर यशवंत पाटील आणि ग्रामपंचायत अधिकारी शरद गोकुळसिंग पाटील यांच्या सहकार्याने दिपा पवार यांना कायमस्वरूपी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात दिपा पवार यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शैलेश दिनेश कंडारे, गौतम सोनवणे आणि सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. एकता सफाई कामगार संघटनेतर्फे सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यात आले.