ॲड. अविनाश सुतार यांची पाचोरा नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड; माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते सत्कार

पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पक्षाचे ॲड. अविनाश देविदास सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज नगर परिषदेत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदाची अधिकृत घोषणा करण्यात आली. ॲड. सुतार यांच्या निवडीबद्दल राजकीय वर्तुळातून त्यांचे स्वागत होत असून, माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
आज झालेल्या नगर परिषदेच्या विशेष बैठकीस नगराध्यक्षांसह भाजपाचे गटनेते सूरज वाघ, नगरसेविका कविता पाटील, कविता हटकर, अमरीन देशमुख, नगरसेवक राहुल गायकवाड, गोपाळ वासवाणी व इतर सर्व नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत ॲड. सुतार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार
निवडीची घोषणा होताच माजी आमदार दिलीप वाघ यांनी ॲड. अविनाश सुतार यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अमोल शिंदे, माजी गटनेते संजय वाघ, दीपक माने, शिवदास पाटील, समाधान मुळे, माजी नगरसेवक वासुदेव महाजन, भूषण वाघ, जगदीश पाटील, भैय्या ठाकूर, योगेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. ॲड. अविनाश सुतार यांच्या निवडीबद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी** आणि भाजपा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ॲड. सुतार आपल्या पदाचा प्रभावी वापर करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






