पाचोऱ्यात व्यापारी एकवटले; हॉटेल मधील घटनेनंतर बैठकीत वर्गणी गोळा करणाऱ्या मंडळाबाबत नाराजी व्यक्त! व्यापारी बांधवांचे पोलिसांना निवेदन

पाचोरा: शिवजयंतीच्या नावाखाली वर्गणीच्या गोळा करण्याच्या कारणावरून हॉटेल व्यावसायिकासोबत झालेल्या वादाचे पडसाद शहरात उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर, शहरातील व्यापारी बांधवांनी मंगळवार, २७ जानेवारी रोजी हॉटेल बीएल पॅलेस येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत व्यापाऱ्यांनी आपल्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत, सक्तीने वर्गणी मागणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी वर्गणीच्या मुद्द्यावरून शासन मान्यता प्राप्त मद्य विक्री तसेच हॉटेल व्यावसायिकाला त्रास देण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हॉटेल मध्ये देखील व्यापारी सुरक्षित नसतील, तर आम्ही व्यवसाय करायचा कसा?” असा संतप्त सवाल या बैठकीत उपस्थित करण्यात आला. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी यावेळी आपल्या व्यथा मांडल्या असून शहरात व्यवसाय करताना व्यापाऱ्यांना वारंवार अशा घटनांना बळी पडावे लागते. तसेच उत्सवांच्या नावाखाली काही मंडळींकडून होणारी पैशांची मागणी आणि त्यातून होणारे वाद यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. कोणत्याही व्यापाऱ्याला त्रास झाल्यास सर्व व्यापारी एकत्र येऊन त्याचा पोलिसांकडून कारवाईची मागणी करतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीच्या शेवटी, संबंधित इसमांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना देण्यात आले आहे. व्यापाऱ्यांनी एकमताने हा ठराव मंजूर केला आहे. या बैठकीला पाचोरा शहरातील नामांकित व्यापारी, दुकानदार आणि विविध व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या एकजुटतेमुळे शहरात आता खंडणीखोर प्रवृत्तींना आळा बसेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





