आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये; अडकलेल्या नागरिकांसाठी ‘विशेष पोर्टल’ व ‘हेल्पलाईन’ सुरू

मुंबई:आखाती देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या असून, अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी विशेष ऑनलाईन पोर्टल आणि हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत.
या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील ‘राज्य आपत्ती संचालन केंद्र’ येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या भागात अडकलेल्या मराठी नागरिकांशी थेट संपर्क प्रस्थापित करणे आणि त्यांना तातडीची मदत पोहोचवणे, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्य शासन या संपूर्ण घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
माहिती संकलनासाठी विशेष पोर्टल
आखाती देशांत अडकलेल्या व्यक्तींचे अचूक स्थान (Location), त्यांचा संपर्क क्रमांक आणि प्रवासाचा तपशील मिळवण्यासाठी शासनाने खालील पोर्टल विकसित केले आहे:
पोर्टल लिंक: https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/
मदतीसाठी संपर्क साधा
ज्या नागरिकांचे नातेवाईक किंवा ओळखीचे लोक आखाती देशात अडकले आहेत, त्यांनी घाबरून न जाता शासनाच्या खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोबाईल क्रमांक: 9321587143
दूरध्वनी क्रमांक: 022-22027990
युद्धजन्य भागात अडकलेल्या नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी वरील पोर्टलवर आपली माहिती तातडीने नोंदवावी, जेणेकरून गरज भासल्यास सरकारला त्यांच्यापर्यंत वेगाने मदत पोहोचवणे शक्य होईल. नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार केंद्र सरकारशी सातत्याने संपर्कात असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.





