नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात मुलांना वाचवताना दोन तरुणांचा गिरणा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू


Advertisements
Ad 4

अवैध वाळू उपशामुळे पडलेले खड्डे ठरले काळ; परिसरात संताप

भडगाव | पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर भडगाव शहरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. गिरणा नदीपात्रात अडकलेल्या लहान मुलांना वाचवण्यासाठी धाडसाने पाण्यात उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. नदीम खान नसीम खान (वय २७) आणि काफिया शरीफ पिंजारी (वय १६) अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी गिरणा नदीपात्रात काही लहान मुले अडकली होती. त्यांना संकटात पाहून नदीम आणि काफिया यांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली. मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले, तरी नदीपात्रातील खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने या दोन्ही तरुणांचा तोल गेला आणि ते पाण्यात ओढले गेले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक महेश शर्मा, महसूल विभागाचे अविनाश जंजाळ, प्रशांत कुंभारे, राजू अहिरे आणि इकबाल शेख यांनी परिस्थितीची पाहणी केली. पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा येथून विशेष पथक पाचारण करण्यात आले. गोताखोर हुसेन दादा, आरोग्य विभागाचे छोटे वैद्य आणि अजय कंडारे यांनी शोधकार्यात मोलाची भूमिका बजावली. नगरसेवक इमरान अली सय्यद यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेला सूचना देऊन मदतकार्य गतिमान केले. तसेच नगरसेवक आसिमभाऊ अलीम शाह आणि डॉ. विजयकुमार देशमुख यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भडगाव ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले आणि या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध मोठा संताप पाहायला मिळत आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने होणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. याच खड्ड्यांमुळे या दोन निष्पाप तरुणांना आपले प्राण गमवावे लागल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, संबंधित वाळू माफियांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button