पाचोरा शहरात गढूळ पाणीपुरवठा; अवैध रेती उपशामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! नगरपरिषदेपुढे मोठे आव्हान

पाचोरा: पाचोरा शहरात सध्या नागरिकांना अत्यंत दूषित आणि मातीयुक्त पाणीपुरवठा होत असून, यामुळे शहरातील जनआरोग्य धोक्यात आले आहे. शहरात कोणतीही पाणी शुद्धीकरण (फिल्ट्रेशन) यंत्रणा उपलब्ध नसल्याने केटी वेअरमधून थेट पाण्याचा उपसा करून तो नागरिकांना पुरवला जातो. मात्र, सध्या या परिसरात रेती माफियांनी धुमाकूळ घातला असून, यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू आहे. या बेकायदेशीर उपशामुळे केटी वेअरमधील पाणी पूर्णतः गढूळ झाले असून, हेच दूषित पाणी कोणत्याही प्रक्रियेविना जलवाहिन्यांद्वारे घराघरांत पोहोचत आहे. विशेषतः जुन्या पाचोरा भागातील मजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना हेच पाणी नाईलाजास्तव प्यावे लागत असल्याने जलजन्य आजारांची भीती निर्माण झाली आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा नगरसेवक राहुल गायकवाड यांनी पाचोरा प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी मागणी केली आहे की, केटी वेअर परिसरातील अवैध रेती उपसा तात्काळ थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने संयुक्त बैठक घेऊन शहरात कायमस्वरूपी पाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करावा. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तात्काळ ‘भरारी पथक’ नेमून प्रत्यक्ष पाहणी करावी, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडेही पाठवण्यात आल्या आहेत.



