पाचोरा बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या महिलेस पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पाचोरा:येथील बस स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेला पाचोरा पोलिसांनी अटक केली आहे. दि. १५ एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी जयश्री स्वप्नील पाटील या एम.एम. कॉलेजमध्ये पेपर देऊन परतण्यासाठी पाचोरा बस स्थानकावर आल्या होत्या. जळगाव बसमध्ये बसत असताना त्यांच्या गळ्यातील ३ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लांबवली होती. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १७४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, एक महिला संशयास्पदरीत्या बस स्थानक परिसरात फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संगीता करण सोळंखी (वय ४२ वर्ष) हिला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल, ज्यामध्ये एक सोन्याचा मणी व दोन डोअरले यांचा समावेश आहे, तो हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी आणि पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, योगेश पाटील, गणेश कुवर,विलास पाटील,प्रिया आहेर यांच्या मदतीने पाचोरा पोलीस पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास पोलीस हवालदार श्रीकांत गायकवाड करत आहेत.





