एस.एस.सी. परीक्षेत सौ. सु. गी. पाटील विद्यालयाचे यश; जयेश भोई पाचोरा व भडगाव तालुक्यात प्रथम

भडगाव: पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. सु. गी. पाटील माध्यमिक विद्यालय, भडगावने यंदाच्या एस.एस.सी. परीक्षेत देदीप्यमान यश संपादन करत आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ८३.८३ टक्के लागला असून, जयेश संभाजी भोई याने ९८.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्यासोबतच पाचोरा आणि भडगाव या दोन्ही तालुक्यांतून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. यंदाच्या परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण १६७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ३५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले, तर ६९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये द्वितीय क्रमांक गौरव संदीप महाजन (९५.००%), तृतीय आदित्य उमाकांत शिंपी (९१.००%), चतुर्थ नंदिनी नारायण पाटील (८९.००%) आणि पाचवा क्रमांक तेजस संदीप पाटील (८८.६०%) यांनी पटकावला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप ओंकार वाघ, चेअरमन संजय ओंकार वाघ, मानद सचिव ॲड. महेश देशमुख यांच्यासह मुख्याध्यापक श्री. ए. बी. अहिरे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या घवघवीत यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.




