पाचोरा शहरात अतिक्रमणाचा विळखा; मानसिंगका रोडवर गटारीच्या कामामुळे वाहतूकिची कोंडी, सामान्य नागरिकांचे मात्र हाल
पाचोरा: जळगाव जिल्ह्यातील प्रमुख व्यापारपेठ असलेल्या पाचोरा शहरात सध्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून, मुख्य रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहनधारकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जळगावहून शहरात प्रवेश करण्यासाठी एक बाह्य वळण रस्ता (हायवे) आणि दुसरा कृष्णापुरी मार्गे जामनेर रोड ते थेट छत्रपती शिवाजी महाराज चौक असे दोन मुख्य मार्ग उपलब्ध आहेत. मात्र, या दोन्ही मार्गांवर दुकानदारांनी रस्त्यापर्यंत थाटलेली दुकाने आणि अस्ताव्यस्त पार्किंगमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी, या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. त्यातच भर उन्हाळ्यात तापामानाचा पारा वाढत असताना, ताटकळत उभे राहणाऱ्या नागरिकांचे हाल होत असून प्रशासनाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे, बस स्टँड रोड ते मानसिंगका रोड दरम्यान नगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या गटारीच्या कामामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. संबंधित ठेकेदाराने बांधकामाचे साहित्य रस्त्याच्या मधोमध टाकल्यामुळे अर्ध्याहून अधिक रस्ता व्यापला गेला आहे, त्यातच दुकानदारांनी आपले सामान दुकानाबाहेर लावल्यामुळे उरल्यासुरल्या रस्त्यातून साधे पायी चालणेही कठीण झाले आहे. या नियोजित कामाच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठेकेदाराकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था किंवा सुरक्षारक्षक नेमण्यात आलेले नाहीत. हा सर्व ‘ढिसाळ कारभार’ पाचोरा नगरपरिषद, स्थानिक पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या डोळ्यादेखत सुरू असून, सत्ताधारी नगरसेवकांनी या विषयात तातडीने लक्ष घालून नागरिकांची या जाचातून मुक्तता करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.






