पाचोरा तालुक्यात महसूल प्रशासनाची कारवाई; कुरंगी आणि वाक येथून अवैध वाळू वाहतूक करणारी डंपर जप्त

पाचोरा:तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने धडक मोहीम उघडली आहे. दिनांक ५ जून २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, ‘टास्क फोर्स पथक क्रमांक २’ ने वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून अवैध वाळू वाहतूक करणारी डंपर पकडण्यात मोठे यश मिळवले आहे.
पहिली कारवाई मौजे कुरंगी (ता. पाचोरा) येथे करण्यात आली. या ठिकाणी विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणारे एक डंपर पथकाने रंगेहात पकडले. हे डंपर जप्त करून पुढील कडक शासकीय व कायदेशीर कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय पाचोरा येथे आणून लावण्यात आले आहे. तसेच, प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या आदेशान्वये याच पथकाने दुसरी मोठी कारवाई मौजे वाक येथे केली. वाक परिसरातून अवैध वाळू घेऊन जाणाऱ्या आणखी एका डंपरवर पथकाने झडप घातली. हे डंपर देखील ताब्यात घेऊन पाचोरा तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. या सलग कारवायांमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
या धडक मोहिमेत ‘टास्क फोर्स पथक क्र. २’ मधील नगरदेवळा येथील मंडळ अधिकारी राहुल पवार, भडगाव येथील मंडळ अधिकारी कुणाल कोळी, तसेच ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे, प्रशांत कुंभारे, तात्याराव सपकाळ आणि समाधान हुलहुळे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन ही कामगिरी यशस्वी केली. पुढील कारवाई तहसील प्रशासनाकडून केली जात आहे.




