ब्रेकिंग न्यूज: नाशिकमध्ये फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीच्या त्रासाला कंटाळून २७ वर्षीय तरुणाने जीवन संपवले! चालक संघटना संतप्त

‘आरबीआय’च्या आदेशाला केराची टोपली; फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीमुळे नाशिकमध्ये तरुणाचा बळी?
नाशिक:
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्ज वसुलीसाठी कोणत्याही ग्राहकाला मानसिक त्रास देणे किंवा सक्तीची वसुली करण्यास बँका आणि फायनान्स कंपन्यांना सक्त मनाई केली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या संदर्भात कडक निर्देश दिले आहेत. मात्र, या आदेशांना केराची टोपली दाखवत फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेला छळ थांबलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. नाशिकच्या आडगाव हद्दीत घडलेली ताजी घटना याचाच प्रत्यय आणून देणारी आहे. एका खासगी फायनान्स कंपनीच्या कथित त्रासाला आणि वसुलीच्या जाचाला कंटाळून महेश दादासाहेब शिंदे (वय २७) या ट्रॅव्हल व्यावसायिक तरुणाने कारमध्येच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खासगी फायनान्स कंपन्यांच्या मुजोरीविरोधात पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मूळचे नांदगाव तालुक्यातील शिंगवे येथील रहिवासी असलेले महेश शिंदे गेल्या आठ वर्षांपासून नाशिकच्या जत्रा हॉटेल परिसरात राहत होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. मात्र, या कंपनीकडून त्यांना वसुलीसाठी वारंवार मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांच्या निकटवर्तीयांकडून केला जात आहे. इतकेच नव्हे तर, त्यांची उपजीविकेचे साधन असलेली कारही फायनान्स कंपनीने सक्तीने ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. या सततच्या मानसिक तणावातून आणि छळाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, ४ वर्षांचा लहान मुलगा, आई-वडील आणि मोठा भाऊ असा परिवार असून, एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा आधार फायनान्स कंपन्यांच्या अमानुष पद्धतीमुळे हिरावला गेला असल्याचा आरोप परिवाराच्या वतीने करण्यात आला आहे.
विष प्राशन केल्याचे समजताच महेश शिंदे यांना तातडीने उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नाशिकमधील वाहन चालक युनियनचे पदाधिकारी आणि चालक यांनी सह्याद्री रुग्णालयाबाहेर जमा झाले. फायनान्स कंपन्यांच्या बेकायदेशीर आणि सक्तीच्या वसुली धोरणामुळेच एका निष्पाप चालकाचा बळी गेल्याचा आरोप करत युनियनने तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘भारतात सक्तीची किंवा गुंडगिरी करून कर्ज वसुली करण्यास कायदेशीर बंदी असतानाही फायनान्स कंपन्या चालकांना मानसिकदृष्ट्या का खचवत आहेत?’ असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.





