नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक! शेतकरी योजना, अतिक्रमण, घरकुल, रस्ते, दुष्काळी उपाययोजनांसह विविध विषयांवर होणार चर्चा


Advertisements
Ad 4

पाचोरा (वार्ताहर) दि. ३ : पाचोरा-भडगाव मतदारसंघातील विविध विभागांशी संबंधित प्रलंबित प्रश्न, संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना व विभागांमध्ये आवश्यक समन्वय, तसेच शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पाचोरा येथील भडगाव रोडवरील कै. आर. ओ. पाटील व्यापारी संकुलात विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत शेतकरी व सर्वसामान्यांसाठी महावितरण, कृषी विभाग व इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा, तसेच संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांवर चर्चा होणार आहे.
यासोबतच पाचोरा व भडगाव नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमणे नियमित करण्याचा प्रश्न, भडगाव येथील सुकी नदी पात्रास नगर भूमापन क्रमांक देणे, भूमी अभिलेख विभागातील प्रलंबित मोजणी प्रकरणे निकाली काढणे, तसेच पाचोरा-तारखेडा रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न यावरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
पाटबंधारे विभागाचे प्रलंबित प्रकल्प, भडगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी जागेची उपलब्धता, पाचोरा व भडगाव पंचायत समितीअंतर्गत घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देणे व मंजुरी, तसेच महिला व बालविकास, सामाजिक वनीकरण आणि एसटी महामंडळाशी संबंधित योजनांचाही आढावा घेतला जाणार आहे.
दरम्यान, बैठकीस संबंधित विभागांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाशी निगडित अद्ययावत माहिती, योजनांचा तपशील, प्रलंबित प्रकरणांची माहिती तसेच आवश्यक कागदपत्रांसह स्वतः उपस्थित राहावे, असे निर्देश पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी दिले आहेत.
मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासोबतच संभाव्य दुष्काळाच्या परिस्थितीत प्रशासनाची पूर्वतयारी, शेतकरी व नागरिकांना योजनांचा प्रभावी लाभ आणि विविध विकासकामांबाबत ठोस आढावा या बैठकीत घेतला जाणार असल्याने या बैठकीकडे पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button