पाचोऱ्यात सट्टा दुकानावर कारवाई अन् धंदापुन्हा सुरू; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

दोन नंबर धंद्यावाल्यांना स्थानिक पोलिसांचे पाठबळ! काही पोलिसांकडून पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनाही दिशाभूल करणारी माहिती
पाचोरा येथील माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील भाजी मंडईतील दुकानात सट्ट्याचा अवैध धंदा पुन्हा एकदा सुरू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते सुधाकर वाघ यांच्या माध्यमातून या बेकायदेशीर कामाचा भांडाफोड करण्यात आला होता. तरीही अवघ्या दोन ते तीन दिवसापूर्वी यावर कारवाई करण्यात आली होती. परंतु हा धंदा पुन्हा सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सोशल मीडियावर समोर आलेल्या संबंधित व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती आपण या धंद्याचे मालक नसून केवळ कर्मचारी असल्याचे स्पष्टपणे सांगताना दिसत होती. “मी मालक नाही, तुम्ही मालकाशी बोला, माझ्यासारखे येथे तीन हजार कर्मचारी काम करतात,” असा दावा त्या व्यक्तीने केला होता. असे असतानाही पोलिसांनी मुख्य सट्टा मालकावर कोणतीही ठोस कारवाई न करता केवळ साध्या नोकरावर कारवाई करून प्रकरण गुंडाळल्याचे समजते.
पाचोरा पोलीस स्टेशन आणि तेथील कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. पाचोऱ्यातील काही पोलिसांच्याच आशीर्वादाने आणि मदतीने या सट्टा चालकाला अभय दिले जात असल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात रंगली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात असल्याचेही बोलले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना देखील त्यांच्याच कर्मचाऱ्यांकडून दिशाभूल करणाऱ्या बातम्या आणि अपूर्ण माहिती दिली जात असल्याचे कळाले आहे. त्यामुळे आता या गंभीर आणि बेकायदेशीर प्रकरणाकडे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार स्वतः गांभीर्याने लक्ष देऊन मुख्य सूत्रधारावर कडक कारवाई करणार, की केवळ बघ्याची भूमिका घेणार? याकडे संपूर्ण पाचोरा शहराचे लक्ष लागले आहे.






