जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर खेडगावच्या राजश्री पाटील यांची मुंबई पोलीस दलात निवड! अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश; खेडगाव नंदीचे येथे जल्लोष व सत्कार

पाचोरा (विशेष प्रतिनिधी): “इच्छाशक्ती दांडगी असेल आणि कष्टाची तयारी असेल, तर परिस्थिती कधीच यशाच्या आड येत नाही,” हे पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील राजश्री दिगंबर पाटील या २१ वर्षीय तरुणीने सिद्ध करून दाखवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या मुंबई पोलीस भरती निकालात राजश्री पाटील यांची मुंबई शहर येथे पोलीस शिपाई पदावर अंतिम निवड झाली आहे. ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण तालुक्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राजश्री यांचे कुटुंब अत्यंत साधे असून, त्यांच्या आई सुलभाबाई पाटील या गावात आशासेविका म्हणून कार्यरत आहेत. गावातील शेतकरी पिंटू रहाटे यांच्या त्या भाची असून राजेश रहाटे यांची आत्याबहीन असून अत्यंत हलकीच्या आणि कौटुंबिक परिस्थितीशी दोन हात करत राजश्री यांनी आपले ध्येय नजरेसमोर ठेवले होते. कोणत्याही अद्ययावत सुविधा नसताना केवळ जिद्द, सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी पोलीस भरतीचे कठीण टप्पे पार करत थेट मुंबई पोलीस दलात आपले स्थान निश्चित केले.
राजश्री यांच्या या यशामुळे खेडगाव नंदीचे गावासह पाचोरा परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागात राहून स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती किंवा इतर शासकीय नोकरीची तयारी करणाऱ्या अनेक तरुण-तरुणींना राजश्री यांच्या या यशोगाथेमुळे एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे.
राजश्री पाटील यांच्या या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत खेडगाव नंदीचे ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी राजश्री यांचे पेढे भरवून अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस व उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. या यशामुळे राजश्री यांच्या माता सुलभाबाई पाटील आणि संपूर्ण पाटील परिवाराचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
‘मधुर खान्देश’ न्युज कडूनही नवनियुक्त महिला पोलीस शिपाई राजश्री दिगंबर पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!





