पाचोरा शहरात वाहतुकीचा बोजवारा; वाहतूक पोलीस गायब, वरिष्ठांचे दुर्लक्ष का? जारगाव चौफुलीवर मोठ्या अपघाताची शक्यता?

(राहुल महाजन, संपादक) पाचोरा शहर झपाट्याने विस्तारत असून, शहरातून जळगाव-चांदवड हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून पाचोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहतूक पोलीस नावापुरतेही शिल्लक राहिले नसल्याचे चित्र आहे. परिणामी, प्रमुख चौकांत वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होत असून, वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक वाहनधारक आपली मोठी वाहने रस्त्याच्या मध्यभागी बिनदिक्कतपणे उभी करतात. यामुळे दिवसभर या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. हीच परिस्थिती रेल्वेचा भुयारी मार्ग, राजीव गांधी टाऊन हॉल, जामनेर रोड ते कृष्णापुरी पूल आणि मानसिंगा रोड ते जारगाव चौफुली या भागातही पाहायला मिळत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर व्यावसायिकांचे वाढलेले अतिक्रमण आणि रस्त्यातच उभ्या राहणाऱ्या गाड्यांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. जारगाव चौफुली सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी तर जीवघेण्या अपघाताची टांगती तलवार कायम आहे. वाहतूक पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणण्याऐवजी त्यांचे फावले आहे.
नागरिकांची मागणी: वरिष्ठांनी लक्ष द्यावे!
शहरात एखादा मोठा अपघात झाल्यावरच पोलीस यंत्रणा जागी होणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. पाचोरा शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, येथे कायमस्वरूपी सक्षम वाहतूक शाखा असणे गरजेचे असून पाचोरा पोलीस स्थानकांतर्गत कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढवणे गरजेचा विषय सध्याच्या घडीला बनला आहे. या गंभीर विषयाकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन पाचोरा शहरात विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था रुळावर आणावी, अशी मागणी जोर धरत आहे.





