नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्यराष्ट्रीय

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नांद्रा येथील शेतकऱ्याचा घास हिरावला; शॉर्टसर्किटमुळे ३ एकर गहू जळून खाक


Advertisements
Ad 4

नांद्रा (ता. पाचोरा): उन्हाचा तडाखा वाढत असतानाच, महावितरणच्या गलथान कारभारामुळे नांद्रा येथील एका शेतकऱ्याचे स्वप्न क्षणात राख झाले आहे. शेतातून गेलेल्या वीज वाहक तारांच्या शॉर्टसर्किटमुळे सुमारे ५० हजार रुपये किमतीचा काढणीला आलेला गहू जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संतप्त शेतकऱ्याने तातडीने भरपाई न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

नेमकी घटना काय?

नांद्रा येथील शेतकरी राहुल देविदास सूर्यवंशी यांच्या गट क्रमांक २७८/२/१ मधील तीन एकर शेतात गव्हाचे पीक जोमाने उभे होते. पीक पूर्णपणे पिवळे होऊन काढणीला आले होते. गेल्या आठ दिवसांपासून हार्वेस्टर मशीन उपलब्ध नसल्याने शेतकरी काढणीच्या प्रतीक्षेत होता. मात्र, बुधवारी दुपारी शेतातून गेलेल्या महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारांमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. यातून पडलेल्या ठिणगीने अवघ्या काही वेळात रौद्र रूप धारण केले आणि सुमारे दोन ते अडीच एकरमधील गहू जळून खाक झाला.

शेतकरी राहुल सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शेतातील वीज वाहक तारा अत्यंत खालून गेल्या असून त्या हाताला लागतील अशा स्थितीत आहेत. या संदर्भात त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा तोंडी विनंती करून तारांना ताण देण्याची मागणी केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आज ही दुर्घटना घडली आणि शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला गेला. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कनिष्ठ अभियंता अनिकेत सावळे, लाईनमन सागर पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर रीतसर पंचनामा केला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

“माझं ५० हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. जर दोन दिवसांत या लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्त केल्या नाहीत आणि मला योग्य नुकसान भरपाई मिळाली नाही, तर मी माहेजी सब स्टेशनवर आमरण उपोषणाला बसणार,” असा इशारा राहुल सूर्यवंशी यांनी दिला आहे.

यावेळी समाधान सूर्यवंशी, बाळू सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. वाढत्या उष्णतेमुळे इतर शेतकऱ्यांनीही आपल्या शेतातून जाणाऱ्या वीज तारांपासून सावध राहावे आणि गुरे-ढोरे सुरक्षित ठेवावीत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button