पाचोरा येथील ‘त्या’ वादग्रस्त तलाठ्याच्या मनमानी कारभाराविरुद्ध नगरसेवकाचा एल्गार; आमरण उपोषणाचा इशारा

पाचोरा:बाळद सजाचे तलाठी अतुल देवरे यांच्या कथित भ्रष्ट कारभाराने आणि अरेरावीने पाचोरा महसूल विभागाची प्रतिमा मलिन होत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक संदीप पाटील यांनी केला आहे. देवरे हे पाचोरा शहरात अवैध वसुलीचा धुमाकूळ घालत असून, वाळूमाफियांशी संगनमत करून तहसीलदारांच्या परवानगीशिवाय जप्त केलेली वाहने परस्पर सोडत असल्याचा खळबळजनक दावा पाटील यांनी निवेदनात केला आहे. या प्रकारामुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळे येत असून, संबंधित तलाठ्याच्या कॉल डिटेल्स (CDR) आणि व्हॉट्सॲप चॅटची सखोल चौकशी करून त्यांचे ‘काळे धंदे’ उघड करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
तक्रारदार नगरसेवक संदीप पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह दाद मागितली असून, देवरे यांच्या वर्तणुकीचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. “माझी बदली कुणीच करू शकत नाही” अशी दर्पोक्ती करत देवरे सर्वसामान्यांना आणि सहकाऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित तलाठ्यावर कठोर कारवाई व बदली न झाल्यास महसूल विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे, ज्यामुळे पाचोरा प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी पाचोरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर बारवकर यांच्यासह नगरसेवक संदीप पाटील उपस्थित होते.




