पोलीस कर्मचारी शरद पाटील यांच्या तत्परतेमुळे वाचला तरुणाचा जीव; पोलिस पोलीस अधीक्षकांकडून विशेष सन्मान

पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार यांचा पाठपुरावा
प्रतिनिधी :पाचोरा शहरातील पोलीस कर्मचारी शरद पाटील यांनी दाखवलेल्या सतर्कता, धाडस आणि मानवतेच्या भावनेमुळे एका तरुणाचा जीव वाचला असून या उल्लेखनीय कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. आत्महत्येच्या तयारीत असलेल्या संबंधित व्यक्तीला वेळीच मदत करून शरद पाटील यांनी त्याला नवजीवन दिले. एखाद्याचा जीव वाचवणे म्हणजे त्याचे संपूर्ण कुटुंब वाचवण्यासारखेच असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मधुर खान्देश वृत्तसेवेच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली होती. बातमीची गंभीर दखल घेत पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी तात्काळ ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी थेट संपर्क साधून पोलीस कर्मचारी शरद पाटील यांना जळगाव पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलवून विशेष सन्मान केला आहे.
पोलीस अधीक्षकांनी दूरध्वनीद्वारे शरद पाटील यांचा सन्मान करत, “डायल 112 सेवेचा खऱ्या अर्थाने उपयोग करून एका व्यक्तीचा अमूल्य जीव वाचवला आहे. पुढील काळातही अशाच प्रकारे समाजहिताचे कार्य करत रहा,” अशा शुभेच्छा दिल्या.या घटनेमुळे पाचोरा पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली असून, संकटसमयी पोलीस दल नागरिकांच्या मदतीला धावून येते याचे पुन्हा एकदा उदाहरण समोर आले आहे.





