फौजी कर्मचाऱ्याकडून ५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी उभाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल!
आरोप मात्र खोटे असल्याचा निलेश उभाळेंचा दावा.
पाचोरा, प्रतिनिधी (दि. १ जून) – जमीन व्यवहारात मध्यस्थी केल्याचा दावा करून भारतीय सैन्य दलातील जवान व त्यांच्या वयोवृद्ध वडिलांकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या प्रकरणी भोजे (ता. पाचोरा) येथील निलेश नामदेव उभाळे यांच्याविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोजे येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले विलास बाबूलाल जाधव यांनी १ जून रोजी पिंपळगाव पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, भोजे शिवारातील एका प्लॉटच्या खरेदी-विक्री व्यवहारात कोणतीही मध्यस्थी केलेली नसताना निलेश उभाळे यांनी मध्यस्थी केल्याचा दावा करत ५० हजार रुपयांची मागणी केली.
फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने मोबाईलवर वारंवार संपर्क साधून शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने केवळ त्यांनाच नव्हे तर त्यांच्या वयोवृद्ध वडिलांनाही पैशांसाठी त्रास देत धमक्या दिल्या असल्यामुळे संपूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली आले असून भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०८(५), ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल रामनाथ पवार करीत आहेत.
याबाबत निलेश उभाळे यांच्याशी संपर्क केला असता सदर गुन्हा हा खोटा असून यामध्ये कोणतीही सत्यता नसून ही सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले आहे.





